सेनाबंडाचा केंद्रबिंदू पुन्हा बुलडाणा जिल्हा : बंडाच्या कुरुक्षेत्रावर ३ ‘संजय’ नावाचे आमदार केंद्रस्थानी!

editor 7 Min Read
7 Min Read

बुलडाणा (राजेंद्र काळे) शिवसेनेत पहिले बंड झाले होते, ३० वर्षांपूर्वी १९९२-९३ ला. त्यावेळी छगन भुजबळ या ढाण्या वाघाने शिवसेनेविरोधात जो पवित्रा घेतला होता तेव्हा बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ.राजेंद्र गोडे यांची भुमिका अग्रस्थानी होती. आता पुन्हा एकदा तीन दशकानंतर शिवसेनेत चौथे बंड झाले असून, त्यात अग्रस्थानी आहेत बुलडाणा जिल्ह्यातीलच दोन आमदार.. अनुक्रमे संजय गायकवाड व संजय रायमूलकर. तर या बंडात भाजपाच्या वतीने चर्चेची पहिली भुमिका निभावली ती बुलडाणा जिल्ह्यातीलच जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी. त्यामुळे ना.एकनाथ शिंदे यांनी खळबळ उडवून टाकणाऱ्या बंडाच्या पहिल्या दिवशी राजकीय कुरुक्षेत्रावर चर्चेत होते ते तीन ‘संजय’ नावाचे, बुलडाणा जिल्ह्यातील आमदार!

 

शिवसेनेविरोधात ज्याकाळी कोणी साधा ‘ब्र’ काढू शकत नव्हता, त्याकाळी म्हणजेच ३० वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरुन बंड केले होते, त्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे होते ते डॉ.राजेंद्र गोडे. गोंडेंमुळेच भुजबळांना बंड करण्याची ताकद मिळाली, असं तेव्हा म्हटलं जायचं. या बंडानंतर छगन भुजबळ यांना काँग्रेसच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद तर डॉ.राजेंद्र गोडे यांना गृहखात्याचे उपमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर ९५ च्या निवडणूकीत काँग्रेस कडून व ९९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून लढलेले डॉ.गोडे पराभूत झाले. म्हणजे इतिहास पाहिलातर, शिवसेनेशी बंड केल्यानंतर डॉ.गोडे यांचे राजकीय अस्तित्वच संपले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तिथेही त्यांच्या हाती काहीही लागले नाही. आता त्यांचे सुपुत्र योगेंद्र गोडे भारतीय जनता पक्षात असून, २०१४ ला ते भाजपाचे अधिकृत तर २०१९ ला ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले.. मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. डॉ.राजेंद्र गोडे आता हयात नसलेतरी, त्यांनी त्यांच्या हयातीत शिवसेना सोडली ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते.. असो!

भुजबळांनंतर नारायण राणे व राज ठाकरे या दोघांनी शिवसेनेविरोधात बंड केले. आज भुजबळ राज्यात व राणे केंद्रात मंत्री असलेतरी, शिवसेनेत असतांना जी किंमत त्यांची होती ती आता दिसत नाही.. हे तेवढेच वास्तव आहे. राज ठाकरे यांनी मनसे नावाचा स्वतंत्र पक्ष काढला, परंतू आज त्यांची ही राजकीय घडी पार विस्कटलेली दिसते.

आता एकनाथ शिंदेंनी चवथे शिवसेनेतील मोठे बंड पुकारले आहे. या बंडातही अग्रस्थानी होते ते आ.संजय गायकवाड व आ.डॉ.संजय रायमूलकर. शिंदेंसोबत कोण-कोण आमदार सुरतला गेलेले आहेत, हे शोधणे जेव्हा सुरु झाले तेव्हा पहिली दोन नावे या दोघांचीच आली. या दोघांनीही शिवसेनेविरुध्द काहीही पाऊल उचलले नसल्याचे जरी सांगितले असले तरी एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे जाणे, हेच त्यांनी उचललेले मोठे पाऊल ठरले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत युती न करता भाजपासोबत सत्ता स्थापन करावी, या ना.शिंदेंच्या भुमिकेला त्यांनी समर्थन दिले. विशेष म्हणजे बुलडाण्याचे आ.संजय गायकवाड यांच्याइतकी अडीच वर्षात भाजपावर जहरी टिका, एकाही शिवसेना आमदाराने केली नाही. कोरोनाचे जंतू सापडले तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबण्याचे वादळी वक्तव्य त्यांनी केले होते. भाजपाचे नेते असणारे डॉ.संजय कुटे यांच्याविरोधात तर त्यांनी बाह्या वर करुन दोन हात करण्याची जाहिर भूमिका घेतली होती. एवढंच काय कुटेंची गाडी सुध्दा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात फोडली होती. संजय कुटेंनी १०० मीटरच्या आत जवळ येऊन दाखवावे, असे आव्हानच त्यांनी दिले होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल कुणी काहीही बोललेतरी, त्यांना थेट अंगावरच नाहीतर शिंगावर घेण्याची भुमिका वेळोवेळी आ.संजय गायकवाड यांनी घेतली. त्यांनीतर नारायण राणे अन् त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्यासह ‘मातोश्री’वर हनुमान चालीसा पठणाकरीता निघालेल्या राणा दांम्पत्यावरही खडसून टिका केली होती. उध्दव ठाकरे हे शिवसेनेच्याच आमदारांना भेटत नाही, असा आता शिंदे गटाचा आरोप असलातरी बुलडाण्याचे संजुभाऊ हे आमदार मात्र त्याबाबतीत अपवाद होते. अगदी उध्दव ठाकरेंच्या कानात बोलून काम करुन घेण्यात संजुभाऊच आघाडीवर होते. एवढी ठाकरे परिवाराप्रती आपुलकीची अन् ठाकरे परिवारावर टिका करणाऱ्यांप्रती कडवट भुमिका असतांनाही आ.संजय गायकवाड यांचे भाजपासोबत जाण्याच्या भुमिकेला समर्थन असणे, हे आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे आ.संजय कुटे हे सुरतमधील लि मेरेडियन हॉटेलला देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन जेव्हा पोहोचले होते, तेव्हा ते आणि आ.गायकवाड हे १०० मीटरच्या आत एकमेकांपुढे आले होते. पण आता आ.गायकवाड यांना गत अडीच वर्षापासून शिवसेनेकडून ना.एकनाथ शिंदे व काही आमदारांवर अन्याय सुरु असल्याचा साक्षात्कार झाला व या बंडाच्या प्रक्रियेत ते केवळ सोबत नाहीतर पुढे राहिले. आज एकनाथ शिदेंच्या खाद्याला खांदा लावून आ.संजय गायकवाड त्यांची सोबत करत आहेत, विशेष म्हणजे शिंदेंसोबत ते सावलीसारखेच वावरत असल्याचे विविध चॅनलवरुन दिसते. या एकूण घडामोडीत अन्य आमदारांवरही लक्ष ठेवण्याचे महत्वपूर्ण काम संजुभाऊंकडे असल्याचे दिसते.

तर मेहकरचे आमदार डॉ.संजय रायमूलकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने आधीच त्यांची नाराजी सेना नेतृत्वावर होतीच, त्यातूनच त्यांची ना.शिंदेंशी सलगी वाढली. सत्ता असूनही आमदारांची कामे होत नसल्याची खंत आ.रायमूलकर यांनी समृध्दी महामार्गाचा मोबदला असो की पेनटाकळीच्या पाण्याचा प्रश्न, त्यावरुन व्यक्त केली होती. ही नाराजी ना.शिंदे यांनी बरोबर हेरुन आ.रायमूलकर यांच्याशी इतकी सलगी केली होती की, संजय रायमूलकर यांच्या दोन्ही व्हॉट्स अ‍ॅप नंबरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो डिपीला होता. त्यात २९ मार्च रोजी रायमूलकर यांच्या मुलीचा जो विवाह सोहळा झाला, त्यात तब्बल ३ ते ४ तास उपस्थित राहून ना.एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. एवढंच काय, हा परिवारातील सोहळा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

 

बुलडाणा जिल्ह्यातील हे तिन्ही आमदार जर सत्तांतर झालेतर मंत्रीपदाच्या शर्यतीत राहू शकतात. आ.डॉ.संजय रायमूलकर हे तीन वेळा निवडून आले असल्याने त्यांचा दावा हा आधीच आहे. आ.संजय गायकवाड हे तर एकनाथ शिंदे यांच्या ‘किचन कॅबिनेट’मधले असल्याने त्यांनाही मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व मागच्या मंत्रीमंडळात केवळ ज्यांना सहा महिन्याची संधी मिळाली होती, ते जळगाव जामोदचे आ.डॉ.संजय कुटे यांचाही जर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सरकार आले तर नंबर लागण्याची शक्यताच नाहीतर तसा विश्वास भाजपा वर्तुळात आहे. एकूणच शिवसेनेच्या या बंडाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा ठरला असून, या घडामोडीत केंद्रस्थानी आहेत ते बुलडाणा जिल्ह्यातीलच ३ ‘संजय’ नावाचे आमदार!

 

आ.राजेश एकडे काँग्रेससोबतच..

मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश एकडे यांच्याविषयी सुध्दा काही चर्चा सुरु झाल्या होत्या सोशल मिडियावर, पण आपण राजकीय जिवनात जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो.. अशी भुमिका त्यांनी मांडून विधान परिषद निवडणूकीत गटनेते ना.बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सांगितलेल्या पसंती क्रमाप्रमाणेच मतदान केल्याचे आ.एकडे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केले.

Share This Article
Exit mobile version