बंडखोरांना प्रत्येकी ५० कोटी? ३००० कोटी स्वाहा!

editor 2 Min Read
2 Min Read
प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दैनिक देशोन्नती

मुंबई (प्रतिनिधी) – बंडखोर शिवसेना नेते व त्यांच्या समर्थक आमदारांवर ३००० कोटी रुपये उडविण्यात येत असून, या बंडखोरांना प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले गेले असावेत, अशा स्वरुपाचे वृत्त विदर्भातील आघाडीचे दैनिक ‘देशोन्नती’ने देऊन राज्यात एकच खळबळ उडविली आहे. हे वृत्त खरे असेल तर राज्यात आतापर्यंत झाला नाही, असा आमदारांचा घोडेबाजार पहिल्यांदाच झाला असल्याने राज्यात लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासला गेल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे.
विदर्भातील लोकनायक म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आहेत. हे दैनिक शेतकरी-बहुजनांचे प्रखड व सडेतोडपणे प्रतिनिधीत्व करते. दैनिक देशोन्नतीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तर बंडखोरी केलीच. परंतु, शिवसेनेतून ३८ आमदारांनादेखील फोडले. त्याच प्रमाणे ९-१० अपक्ष आमदारांनाही त्यांनी मॅनेज केले. मात्र, त्यांच्यासाठी सुरत ते गुवाहाटीपर्यंत जाण्यासाठी चॅटर्ड प्लेनची सोय नेमकी कुणी केली? सुमारे ५० बंडखोर आमदारांना गुवाहाटीत आणण्यासाठी आणि तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च येत आहे, हा खर्च कोण करत आहे? पुढील काही दिवस हा खर्च चालणार आहे. तेव्हा या मिशनमागे कोण आहे? सर्व साधारणपणे सर्व बंडखोर आमदारांवर ३००० कोटी रुपये खर्च होणार आहे. हिंदुत्वाचा बुरखा घातलेल्या या आमदारांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात नेमके कोण पैसा खर्च करत आहे? असे सवालही दैनिक देशोन्नतीच्या या वृत्तात उपस्थित करण्यात आले आहेत.
प्रत्येक आमदाराशी ५० कोटी रुपयांची डिल झाली असावी, असे नमूद करत हा पैसा कुणी दिला? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. या वृत्ताने गेले चार दिवस सुरु असलेल्या राज्यातील या राजकीय नाट्याचा बुरखा फाटला असून, शिंदेंच्या बंडखोरीमागे कोण आहे? याचा वास आता सर्वसामान्य नागरिकांना येऊ लागला आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या मनात कमालीची घृणा निर्माण झाली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे. या बंडखोरीचे गंभीर परिणाम या शिवसेना बंडखोरांना भोगावे लागेल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
———————

Share This Article
Exit mobile version