शिंदे मुंबईकडे निघाले, ठाकरे आक्रमक झाले!

editor 4 Min Read
4 Min Read

–  मुंबईला येताे सांगून, शिंदे अचानक दिल्लीला गेले, कुणाला भेटले?

– बंडखोर नेते उपसभापतींकडे ओळख परेड देणार
– बंडखोर ४० आमदारांच्या खासगी सचिव, कमांडो आणि पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश
– आणखी चार बंडखोर आमदारांच्या निलंबनाचे शिवसेनेचे उपसभापतींना पत्र
– उपसभापतींचा शिंदे गटाला झटका, एकनाथ शिंदेंना हटवून अजय चौधरींना शिवसेना गटनेते म्हणून मंजुरी

–  आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा – ठाकरे

– शिवसैनिक आक्रमक, बंडखाेरांच्या कार्यालयावर हल्ले, काळेही फासले

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – अखेर चौथ्या दिवशी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीवरून आपल्या समर्थक आमदारांसह मुंबईकडे निघाले हाेते. परंतु, अचानक ते दिल्लीला गेले. दिल्लीत ते नेमके कुणाला भेटले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिंदे अशी विधिमंडळात व रस्त्यावर जोरदार लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले असून, बंडखाेरांच्या कार्यालयावर हल्ले करत आहेत. तसेच, ठीकठिकाणी तीव्र निषेधही करत आहेत. मुंबईत येऊन एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार हे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे ओळख परेड देणार असून, शिंदेंना आपल्यासोबत ३७ पेक्षा जास्त शिवसेना आमदार असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. यावेळी शिंदे हे आमदारांच्या समर्थनाचे पत्रही त्यांना सोपावणार आहेत.
दरम्यान, चौथ्या दिवशी शिवसेना प्रचंड आक्रमक झाली असून, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री निवासस्थान सोडले आहे, मुख्यमंत्रीपद नाही, अशा शब्दांत बंडखोरांना ठणकावले. तसेच, बंडखोर ४० आमदार महाराष्ट्र सोडून बाहेर जात असतानाही त्यांची माहिती सरकारला न दिल्यामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या संबंधित आमदारांचे स्वीयसहाय्यक, कमांडो आणि पोलिसांवर सक्त कारवाईचे आदेशही ठाकरे यांनी दिले आहेत.

यापूर्वी बंडखोर १२ आमदारांच्या निलंबनाचे पत्र शिवसेनेने उपसभापतींना दिले होते. आता आणखी चार आमदारांच्या निलंबनाचे पत्र सभापतींना देण्यात आले आहे. या शिवाय, शिवसेनेची लीगल टीम (कायदेतज्ज्ञांनी फौज) देखील विधानसभेत पोहेचलेली आहे.

आम्ही बंडखोरांना चोवीस तासाचा वेळ दिला होता. आता त्यांची वेळ संपली आहे. आता शिवसेना काय ताकद आहे, ते बंडखोरांना दिसेल. बहुमत परीक्षेतून काय ते स्पष्ट होईल, असा इशाराही खा. संजय राऊत यांनी दिला. विधानसभेच्या उपसभापतींनीदेखील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना झटका देत, शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवत, अजय चौधरी यांना विधिमंडळ गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेना आक्रमक होताच, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात असून, आमच्या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले. परंतु, आम्ही घाबरणार नाही. आमच्याकडे शिवसेनेचे ३९ आमदार आणि १४ अपक्ष आमदार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनेने घेतली जिल्हाप्रमुख, नेत्यांची बैठक
दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुखांना मुंबईत बोलावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते हजर होते. या सर्व नेत्यांना बंडखोरांविरोधात जोरदार मोर्चा उघडण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. तसेच, जनतेत जाऊन सरकारने केलेली कामे व बंडखोरांनी पक्षाशी केलेली गद्दारी आदी बाबी समजावून सांगण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही, असं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करु नये का असा सवालही त्यांनी केला. या सर्वाचा आता वीट आला असून तीच वीट आपण यांच्या डोक्यात हाणणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिलं आहे. या बैठकीसाठी राज्यातले जवळपास 250 अधिक पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
——————-

Share This Article
Exit mobile version