आळंदी ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात मातृपितृ पूजन

editor 3 Min Read
3 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रशालेत संस्कारक्षम उपक्रमाचा भाग हृदयस्पर्शी असा मातृपितृ, आजी आजोबा यांचे पूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष्य एक दिवा आहे पणं त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजेच आई वडील असतात. अशा या आई – वडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही म्हणूनच त्यांच्या प्रती प्रेमभाव, आदर, कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्वांचे परम कर्तव्य असते. या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृपितृ पूजन दिन येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात मातृपितृ पूजन सोहळ्याची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मंजुश्री वडगावकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शालेय मुला मुलींचे आजी आजोबा, आई, वडील, पालक, नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत अनेक दाखले देऊन आई वडिलांचे महत्त्व सांगितले. या सोहळ्याच्या निमित्ताने अर्जुन मेदनकर यांनी आई – वडील हे संस्काराचे विद्यापीठ असून तेथूनच मुलांना संस्कार मिळत असतात, मुलांनी आई वडील, गुरुजनांचा आदर करावा अशी भावना व्यक्त करून या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आई वडील हे माऊलींचे रूप असून आपल्या जडणघडणीत व जीवन यशस्वी होण्यात त्यांचा सर्वात मोठा सहभाग असतो अशा माऊलींचे पूजन आपल्या प्रशालेत दरवर्षी होत असते ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले.

प्रशालेत संस्कारक्षम सोहळा दरवर्षी प्रमाणेच हृदयस्पर्शी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वर्षी आई वडिलां बरोबरच आजी – आजोबा देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी भारतातील इतर भाषांमध्ये आई वडीलांना काय म्हणतात याची माहीती देऊन विद्यार्थ्यांना माता-पित्यांचे पूजन कसे करावे याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूचने प्रमाणे प्रथम आई वडीलांना कुंकुम तिलक करून त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहून हार घातला. त्यांना ओवाळले. यावेळी आई वडिलांनी देखील मुलांना कुंकुम तिलक लावले. हार घालून ओवाळले व दोघांनीही एकमेकांना गोड खाऊ प्रसाद दिला. मुलांनी आई वडीलांना सात प्रदिक्षणा घालून त्यांच्या पायावर नतमस्तक झाले. आई वडिलांनी मुलांना मिठीत घेऊन त्रिलोचन बनण्या करिता आशिर्वाद दिले. मुलांनी देखील आई, वडिल, गुरुजनांचा आदर करण्याचा संकल्प केला. हा सोहळा यशस्वी करण्यास काळे वर्षा, निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण यांचेसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.

Share This Article
Exit mobile version