बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बलात्काराची खोटी तक्रार देऊन नंतर न्यायालयात आपला जबाब फिरविणे महिलेला चांगलेच अंगलट आले आहे. बुलढाणा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी याप्रकरणी तक्रारदार महिलेलाच आरोपी करत, दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ई-फायलिंगद्वारे दाखल केलेले अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेने कोर्टात प्रकरण आल्यानंतर आरोपीने बलात्कार केलाच नाही, अशी भूमिका घेतल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयात साक्ष फिरवणार्यांना जरब बसवणारा हा निकाल ठरला आहे.
चिखली तालुक्यातील किन्हीनाईक येथील २७ वर्षीय विवाहितेने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती परगावी गेले असताना पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. शेवटी तिने पोलिसांत आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तिचा आणि साक्षीदारांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करीत तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पीडित महिलेने न्यायदंडाधिकारी समोर जबाबही नोंदवला होता, आणि प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. परंतु पीडित फिर्यादी महिलेने न्यायालयामध्ये साक्ष फिरवली आणि तिच्यासोबत आरोपीने कोणतेही कृत्य केले नाही, असा खोटा पुरावा देऊन फितूर झाली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते.
मात्र न्यायालयाने निर्णय देताना फिर्यादी महिलेने जाणून बुजून न्यायालयात खोटी साक्ष दिल्याची बाबही समोर आणल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे या तक्रारदार महिलेवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ नुसार वेगळी कारवाई करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी स्वतः ई-फायलींच्या माध्यमातून हे प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेला आपली बाजू मांडण्याची संधीसुद्धा देण्यात आली होती. मात्र पीडित महिलेने आपले म्हणणे मांडले नसल्याने काल न्यायालयाने या महिलेला शिक्षा सुनावली.
न्यायालयात जाणून बुजून खोटी साक्ष दिल्याचे दोषी धरत, आणि यंत्रणेला कामाला लावल्याचा ठपका ठेवत, फौजदारी प्रक्रियेच्या संहितेनुसार कलम ३४४ नुसार दोन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे, ई-फायलिंगद्वारे दाखल केलेल असे हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
———————

