वर्धा (प्रकाश कथले) – सिंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विखणी (जसापूर) गावात भरदिवसा लागलेल्या आगीत चार घरांची राखरांगोळी झाली. या घरात राहणार्यांचे संसार उघड्यावर आले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हे अग्नितांडव सुरू झाले. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
विखणी (जसापूर) गट-ग्रामपंचायतीच्या आदिवासी पाड्यातील चार घरांना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने सतीश कौरती, गजानन कौरती, दीपक कौरती आणि संजय कन्नाके या आदिवासी कुटुंबातील नागरिकांच्या चार घरांची राखरांगोळी केली. चारही घरातून अचानक धूर निघत असल्याचे दिसताच शाळकरी विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. पण दुपारची वेळ असल्याने मोजकेच नागरिक गावात उपस्थित होते. गावातील नागरिक शेतकरी,किंवा मोलमजुरी करणारे असल्याने बहुतांश नागरिक शेतात गेले होते. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती विखणी येथीलच अमोल सोनटक्के यांनी सिंदी नगरपालिका कार्यालय तसेच पोलिस निरीक्षकांना दिली होती. पण पालिकेच्या अग्निशमनदलाचा वाहनचालक गैरहजर असल्याने त्याला शोधण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास उशिरा निघाली.
दरम्यान विखणीच्या १३० तरुणांनी एकजूट दाखवून आग विझवण्याकरीता प्रयत्न सुरू केले होते. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळाले. यानंतर सिंदी नगरपालिकेच्या अग्निशमनदलाचे पथक विखणीत पोहोचले. घरांना लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात काहींना किरकोळ इजा देखील पोहोचली. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि तलाठी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही.