मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेने बंडखोरांसाठी आपले दरवाजे खुले ठेवत, चोवीस तासांच्याआत परत आले तर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मात्र, आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू. या सरकारची क्षमता बहुमत परीक्षेत सिद्ध होईलच, असा विश्वास व्यक्त केला. आपण अनेकवेळा महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली व हाताळलेली आहे. आणि, मला खात्री आहे, की ठाकरे सरकार या संकटावर यशस्वीपणे मात करेल, असेही पवार यांनी अगदी नीक्षून सांगितले.
शिवसेनेच्यावतीने भूमिका मांडताना, पक्षप्रवक्ते खा. संजय राऊत यांनी काही तासांपूर्वीच जाहीर केले होते, की बंडखोरांनी चोवीस तासांच्याआत परतीचा रस्ता धरला तर शिवसेना निश्चितच महाविकास आघाडीतून बाहेर पडेल. परत या, आणि तुमच्या काय असतील त्या मागण्या पक्षनेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडा, असेही राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेते व आमदारांची बैठक घेऊन, ठाकरे सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच, विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवू, असेही विरोधकांना ठणकावले.
काल रात्री गुवाहाटीवरून १७ आमदार परत येण्यासाठी निघाले होते. परंतु, त्यांना अनाकलनीयरित्या परत बोलावण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. तसेच, आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि आशीष जैस्वाल हेदेखील आज परत निघाले असता, त्यांना अचानक कुणी तरी परत बोलावले असल्याचे दिसून आले. त्यामुळे एकनाथ शिंदे व शिवसेना बंडखोरांमागे कुणी तरी मोठी राजकीय ताकद असल्याचे आता उघड झाले आहे. दुसरीकडे, भाजपचे पक्षनेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मौन बाळगत, गुपचूपपणे आपले कार्य सुरु ठेवले असल्याचेही राजकीय सूत्राने सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त १५च आमदार
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभर तीनवेळा शिवसेना खासदार व आमदारांच्या बैठका घेतल्या. शेवटची बैठक झाली तेव्हा ठाकरे यांच्यासोबत फक्त १५ निष्ठावंत आमदार असल्याचे उघडकीस आले. पैकी, ८ आमदार हे मुंबईतील आहे. या व्यतिरिक्त वैâलास पाटील (उस्मानाबाद), नितीन देशमुख (बाळापूर), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर (हिंगोली), भास्कर जाधव (गुहागार) या इतर आमदारांचा समावेश आहे.

