– उद्धव ठाकरे गटाने निवडणुकीशिवाय शिवसेनेत पदाधिकारी नियुक्त केले, हे असंवैधानिक : आयोग
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात ज्या संशयाची पाल चुकचुकत होती, अगदी तोच संशय खरा ठरू पाहात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची असल्याचा धक्कादायक निकाल दिला आहे. हा निकाल ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एवढेच नाही तर शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह व ‘शिवसेना’ हे नावदेखील शिंदे गटाला मिळाले आहे. शिवसेनेच्या विद्यमान घटनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही बदल केले असून, आपल्या जवळील नेत्यांना असंवैधानिक पद्धतीने पदाधिकारी नियुक्त केले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्याविरोधात निकाल दिला आहे.
शिवसेना पक्ष चिन्ह व नाव याबाबत ठाकरे व शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. त्या दाव्यावर दोन्ही बाजूंनी पुरावे व युक्तीवाद झाल्यानंतर आज आयोगाचा महाराष्ट्राला जबरदस्त हादरा देणारा निकाल आला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा झाला आहे. आयोगाने पक्षचिन्ह व नाव वापरण्यास शिंदे गटाला अनुमती दिली आहे. आयोगाच्या निरीक्षणानुसार, शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेत झालेले काही बदल हे १९९९ मध्ये नामंजूर करण्यात आले होते. ते बदल अलोकतांत्रिक पद्धतीने पुन्हा लागू करण्यात आले आहेत. जेणे करून शिवसेना हा पक्ष खासगी जागीर होऊन बसला आहे. त्यामुळे असंवैधानिक बदल व त्यानुसार जवळच्या व्यक्तींना पदे देण्यात आल्याने उद्धव ठाकरे गटाची दावेदारी आयोगाने नाकारली आहे.
शिवसेनेेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.
शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.
देशात लोकशाही उरलेली नाही. सर्व स्वायत्त संस्था आज गुलाम बनल्या आहे. आम्ही कायदेशीर लढाई सुरुच ठेवू. माझा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. लोकशाहीवरचा विश्वास आज पूर्णपणे उडून गेला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आजचा निकाल म्हणजे खोक्यांचा विजय आहे. हा निकाल विकत घेतला असून खोक्यांचा वापर कुठेपर्यंत झाला हे समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी उभारलेला पक्ष 40 बाजारबुणगे येतात आणि पक्ष विकत घेतात हे लक्षात ठेवलं जाणार, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास गमावला आहे. स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे हे दिसून आलं. स्वायत्त संस्था गुलाम असल्यासारखं वागत आहेत. असंही संजय राऊत यांनी म्हटले.

