बुलढाणा (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्राची सांगड घातल्याने ते यशस्वी होऊ शकले. आज त्या प्राचीन शस्त्रांची गरज नाही ती जागा शास्त्राने म्हणजेच लेखणीने घेतली आहे. त्यामुळे आजचे शस्त्र व शास्त्र विचारात घेऊन वाटचाल झाल्यास यशश्री खेचता येईल, असे प्रतिपादन लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन जिजामाता क्रीडा संकुल परिसरात करण्यात आले. चिलखत, भाला, तलवार, ढाल, खंडा तलवार, दांडपट्टा, तोफ गोळा, बिचवे, कट्यार, वाघनखे, खंजीर आदी जुन्या शिवकालीन -प्राचीन शस्त्रांचे दर्शन या निमित्ताने बुलढाणाकरांना झाले.
शाळांचा उदंड प्रतिसाद
शाळांचे विद्यार्थी शस्त्र प्रदर्शनी पाहण्यासाठी आल्याने कार्यक्रमास यात्रेचे स्वरूप आले होते. गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वायाळ, मनोहर धंदर यांच्यासह ठाणेदार प्रल्हाद काटकर आदींनी भेटी दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील अनेक शाळांनी शस्त्र प्रदर्शनी साठी विद्यार्थी आणले होते. कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले, सचिव सुनील सपकाळ, माजी अध्यक्ष रंजीतसिंग राजपूत, जयसिंग राजे देशमुख, मृत्युंजय गायकवाड, प्राध्यापक अनिल रिंढे, प्राध्यापक शाहीनाताई पठाण, विजयाताई काकडे, पत्रकार गणेश निकम, अनिता कापरे, प्राचार्य ज्योती पाटील, प्रा. जगदेवराव बाहेकर प्रा. पठाणसर, वैशाली ठाकरे, दामोदर बिडवे, राजेंद्र धोंडगे, प्राचार्य सुनील जवंजाळ शिवश्री संजय खांडवे, अंजली परांजपे आदींनी सहभाग घेतला.
पेन हेच आजचे शस्त्र – आ. गायकवाड
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले हे करीत असताना त्यांनी कठोर परिश्रम घेतले. परिश्रम घेण्याची तयारी ठेवून कार्य करणे म्हणजे शिवकार्य असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर वेगवेगळी क्षेत्र ताब्यात घेणे हे महत्त्वाचे आहे. पेन व संगणक आजचे प्रभावी शस्त्रास्र आहेत, असे आमदार गायकवाड म्हणाले.
———————–

