मढ, ता. बुलढाणा (संतोष थोरहाते) – संतांना भेटावे आत्मधन लुटावे. संतांची भेट घेणे म्हणजे भगवंताची भेट घेणे होय. भ्रांताला शांत करतात ते संत. संत दर्शनाने पाप, ताप व दैन्यापासून मुक्तता होते. संत केवळ उपदेशच करीत नाही तर स्वतःच्या आचरणाने समाजापुढे आदर्श ठेवून समाजाला सन्मार्ग दाखवितात. संतांनी परमार्थाचे दुकान थाटले आहे. संत कृपाळ व दयावान असतात. भक्तांवर सदैव कृपा करीत असतात. संतांच्या कृपा प्रसादाने जीव हा भवसागर तरून जातो. संतांनी ईश्वर प्राप्तीचा भक्तिमार्ग दाखविला असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. सौ. स्वाती महाराज राजगुरे यांनी केले. बुलडाणा जिल्ह्यातील मढ येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्य आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशीच्या कीर्तनरूपी पुष्पसेवेत गुरूवारी भाविकांशी त्या बोलत होत्या.
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। कींव माझी सांगा काकुळती
अनाथ अपराधी पतित आगळा। परी पायां वेगळा नका करु
तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी। मग मज हरी उपक्षेणा
हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा विनंतीपर चार चरणांचा अभंग त्यांनी कीर्तनरूपी सेवेशी निवडला होता. रूप पाहता लोचणी या अभंगाच्या गायनाने श्रोतृगण मंत्रमुग्ध झाले होते. पुढे बोलतांना हभप स्वाती महाराज राजगुरे म्हणाल्यात की, संतांनी भवसागरात राहून परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे यांची शिकवण दिली. संतांनी दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता या गुणांची शिकवण दिल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————-

