मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळमध्ये भरचौकात दिवसाढवळ्या सर्व बाजूंनी कॅमेरे चालू असताना रहदारीच्या ठिकाणी एका व्यक्तीवर दुसर्याने चाकूने वार केला. ही घटना कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचार करायला भाग पाडते. जानेफळात रापीच्या थरार नाट्यामुळे श्यामला जीवानिशी जायाला भाग पडल्यामुळे जानेफळात तशी नोंद झाली आहे.
तसे जानेफळ हे ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे. पौराणिक काळामधील सप्तऋषींचे सातही ठिकाणे या जानेफळ नगरीच्या अगदी आसपास आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर जानेफळमध्ये शिवकालीन बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. त्याचबरोबर इंग्रजांच्या काळातील जानेफळ हे मोठे सत्ताकेंद्र होते. आजही जानेफळमध्ये ५२ दरवाजांची इमारत, मोठी प्रशस्त बांधलेली बाजारपेठ, त्याचबरोबर इंग्रजकालीन धर्मशाळा, कचेरी कार्यालय हे सर्व आजही वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आपले अस्तित्व टिकून उभे आहेत. जानेफळ हे गाव सुरुवातीपासूनच एक मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. जानेफळच्या आसपास तीस चाळीस खेड्यांचा परिसर आहे. या सर्व खेड्यांचा दळणवळण सर्व शेकडो वर्षापासून जानेफळशी निगडित आहे. जानेफळमध्ये आजही हजारो लोकांची सतत बाजूच्या खेड्यापाड्यातून येजा चालू असते. जानेफळमध्ये अध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध अवधूत आनंद संस्थान आहे. जानेफळचा अनेक संकटापासून बचाव करत असलेले जगदंबा मातेचे मंदिरसुद्धा आहे. या जानेफळमधील झुलती दीपमाळेची ऐतिहासिक पुस्तकात नोंद सुद्धा असल्याचे जुन्या जाणत्या लोकांकडून सांगितले जाते. जानेफळमध्ये एकेकाळी सुत निर्माण करणारी जिनिंग फॅक्टरीसुद्धा होती. याच जानेफळ मध्ये मोठे धान्य मार्केट सुद्धा आहे. बाजूच्या खेड्यांमध्ये याच गावातून विद्युत पुरवठा केला जातो.
येथेच प्राथमिक शिक्षणापासून पदवी शिक्षणापर्यंत अगदी उच्च शिक्षणापर्यंतसुद्धा शैक्षणिक महाविद्यालय आहेत. याच गावात इंग्रजी शिक्षणाचीसुद्धा व्यवस्था आहे. आर्थिक व्यवहारासाठी अनेक बँका मदतीला आहेत, आणि परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येथे सरकारी दवाखानासुद्धा थाटात उभा आहे. आणि, या सर्व बाबी व्यवस्थितपणे चालवण्यासाठी आणि त्यावर लक्ष देण्यासाठी ग्रामपंचायत आहेच. आणि मदतीला कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सुसज्ज पोलीस यंत्रणासुद्धा आहे. हा सर्व जानेफळचा वैभवशाली इतिहास असताना अचानक काही दिवसांमध्ये जानेफळ मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे सुरू झाले. मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू झाली आणि जानेफळ आणि परिसरातील गावकर्यांचे आरोग्य शैक्षणिक भविष्य आणि सुखी संसार याला जणू ग्रहण लागले. ज्या सुज्ञ गाव पुढार्यावर गावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते, ते सर्व गाव पुढारी, अवैध धंदेवाले आणि त्यांना मदत करणारे पोलीस यांच्या हातात हात घालून त्यांना जणू सहकार्य करू लागले. वास्तविक कोणताही अधिकारी हा गावांमध्ये येत असताना गावाचा सेवक म्हणून येत असतो. लोकशाहीमध्ये तशी तरतूद आहे.
विशेषतः पोलीस अधिकार्याला गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही विशेष अधिकार दिले जातात. त्यामुळे त्या अधिकार्याला महत्त्व प्राप्त होत असते आणि ते अधिकार हे गावाच्या सेवेसाठी असतात. प्रशासकीय तरतुदीनुसार कोणताही अधिकारी केवळ दोन ते तीन वर्षे गावामध्ये आपली सेवा देत असतो आणि त्यानंतर त्याची बदली ठरलेली असते. मात्र गाव आणि गावकरी हा तेथेच राहत असतो. याची जाणीव न ठेवता गाव पुढारी आणि काही प्रभावशाली व्यक्तींना हाताशी बाळगून या अधिकार्यांनी अवैध धंदे आणि अवैध दारू याची जणू गल्लोगल्ली लायसन्स दिल्यासारखे वातावरण आहे. त्यातून सर्वच संबंधित अधिकार्यांचे अर्थकारण जोरात असले तरी, गावाचा मात्र सत्यानाश सुरू आहे.
गावच्या ग्रामपंचायतला अशा अधिकार्यांच्या बदल्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे. आणि ह्यातच या कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे अधिकार्यांनी याचा फायदा घेतला आहे. एकेकाळी शांततेची पार्श्वभूमी असलेल्या या गावांमध्ये अनेक लोकांकडे शस्त्रेसुद्धा असू शकतात आणि कधीही गावामध्ये अशा विपरीत घटना घडू शकतात. जानेफळचा सध्याचा विकास पाहता अनेक व्यवसायिक सुद्धा या गावांमध्ये येत आहेत. त्याचबरोबर शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा पाहता त्या दृष्टीनेसुद्धा अनेक सुशिक्षित लोक, शेतकरी लोक या गावांमध्ये येऊन वास्तव्य करीत आहेत. परंतु गावकर्यांच्या अशा दुर्लक्षितपणामुळे आणि पोलीस प्रशासनावर नसणार्या वचकामुळे पुढे या गावचा विकास मात्र खुंटला जाईल. अधिकार्यांचे काय ते दोन वर्ष राहतील आणि मलिदा खातील आणि चालले जातील! मात्र गावचे आणि गावक-याचे त्यांच्याअशा बघ्याच्या भूमिकेमुळे मात्र फार मोठे नुकसान हे नक्की! म्हणून गावकर्यांनी, गावकरी आणि अधिकारी यांच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. नाहीतर जानेफळच्या होणार्या अधोगतीला आपणच कारणीभूत राहू!!

