जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह शहर आणि परिसरात आज सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा माहिती केंद्राच्या अधिकार्यांकडून देण्यात आली. भुसावळसह लगतच्या सावदा, कंडारी, रायपूर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. नाशिक वेधशाळेपासून २७८ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली तसे, भीतीचे वातावरण परसले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने अॅलर्ट जारी करत, नजीकच्या बुलढाणा जिल्हा प्रशासनालाही कळवले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले होते. तसेच त्यांना मैदानावर बसवण्यात आले होते. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांकडून पत्रकार परिषद बोलावून माहितीदेखील देण्यात आली होती. जळगावला खेटून बुलढाणा जिल्हा असल्याने जिल्हा प्रशासनाने बुलढाणा जिल्हा प्रशासनालादेखील याबाबत तातडीने माहिती दिली. तसेच, सोशल मीडियावरदेखील मेसेज पाठवून नागरिकांना अॅलर्ट करत, घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
——————–

