– प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी व कवी डॉ. कुमार विश्वास यांची उपस्थिती लाभणार
– परिसंवाद, कविसंमेलन, ग्रंथप्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम
– समारोपास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार
वर्धा (प्रकाश कथले) – विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण, बॅचलर रोड, वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर स्वागताध्?यक्ष दत्ता मेघे आहेत.
मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. याच व्यासपीठावर शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप रविवार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
मुलाखत व मुक्त संवाद
शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत घेतील, याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी ‘सौमित्र’ किशोर कदम यांचा सहभाग असलेला ‘मुक्त संवाद’ हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले हे अध्यक्षस्थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील.
परिसंवाद आणि परिचर्चा
या संमेलनात मनोहर म्हैसाळकर सभामंडप व आचार्य विनोबा भावे सभामंडपामध्ये तीन दिवस एकूण तेरा विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्यात कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेत्तर साहित्याची वाढती लोकप्रियता, विदर्भातील बोलीभाषा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, वैदर्भीय वाडमयीन परंपरा, गांधीजी ते विनोबाजी:वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून, वाचन पर्यायाच्या पसा-यात गोंधळलेले वाचक, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे) विषयावर परिचर्चा होणार असून संमेलनाध्यक्षांचे भाषण व त्यावर चर्चादेखील होईल.
कवितेचा जागर व इतर कार्यक्रम
निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन ३ तारखेला रात्री ८.३० जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. रात्री ८ ८ वाजता ‘मृद्गंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ हा विदर्भ साहित्य संघाची प्रस्तुती असलेला कार्यक्रम होणार आहे. दुसरे कविसंमेलन ४ तारखेला रात्री ८.३० वाजता श्याम माधव धोंड यांच्या अध्यक्षतेत होईल. याशिवाय, गझलकट्टा, कविकट्टयाचेदेखील आयोजन करण्यात आले असून, या महाराष्ट्रभरातून आलेले सुमारे ९०० कवी तीन दिवस कवितेचा जागर करणार आहेत. ३ तारखेला दुपारी २ वाजता डॉ. सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. रंगदृष्टी प्रस्तुत ‘गावकथा’ हा एकांक, युवक बिरादरीचा ‘तीर्थधारा’ तसेच, श्याम गुंडावार व श्याम सरोदे यांचा ‘अभंगधारा’ असे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील संमलेनादरम्यान होणार आहेत.
२ फेब्रुवारीला ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन
संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्?या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे तसेच, ग. त्र्यं. माडखोलकर वाचन मंचाचे उद्घाटन गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. यात एकुण २९० ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी प्रकाशनांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. बुधवारी १ तारखेला सायंकाळी ६.३० वाजता सत्यपाल महाराजांचे खंजिरीभजन होणार आहे. याशिवाय, बालसाहित्य मंच, बसोली ग्रुप व स्कुल ऑफ स्कॉलर्सतर्फे चित्रकाव्य प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे.
पत्रकार परिषदेला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीचे समन्वयक प्रदीप दाते यांनी दिली. पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे समन्वयक डॉ. रवींद्र शोभणे, प्रमुख कार्यवाह विलास मानेकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अनिल गडेकर यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
—————

