– उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा, मिलिंद नार्वेकरांनी हॉटेल सोडले
– आमच्या आमदारांना सुरतमध्ये डांबून ठेवलं आहे, संजय राऊत यांचा आरोप
– शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजित पवारांची उद्धव ठाकरेंशी चर्चा
– “ऑपरेशन लोटस” फेल करण्यासाठी पवारांनी दिला मास्टर प्लॅन!
– सरकार बनविण्यासाठी शिंदेंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव नाही, भाजपने हात झटकले
– महाआघाडी सरकारला कोणताही धोका नाही – काँग्रेस
सुरत/मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, या मागणीवर बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे अडून बसलेले असून, त्यांच्यासोबत एकूण १३ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक यांनी शिंदेंसह बंडखोरांची सुरत येथील हॉटेलमध्ये भेट घेतली. तब्बल दोन तास चर्चा झाली, त्यानंतर शिंदे हे २० मिनिटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले. भाजपसोबत युती करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. तर मी राजीनामा देतो, फडणवीसांसोबत काय जाता, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असे ठाकरे यांनी शिंदे यांना सांगितले. दरम्यान, बंडखोरांपैकी अनेकांनी हॉटेल सोडण्याचा प्रयत्न चालविला असल्याची खात्रीशीर माहिती असून, गुजरात पोलिस व हॉटेल प्रशासन त्यांना बाहेर येऊ देत नाही, असे सांगण्यात येते. या सर्व आमदारांना दिल्ली किंवा अहमदाबाद येथे नेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे भाजपची ऑपरेशन लोटस मोहीम फत्ते होते की नाही, याबाबत सस्पेन्स निर्माण झालेला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे सत्तेसाठी प्रस्ताव दिलेला नाही, आम्हीही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती भाजप नेत्याने दिली.
दरम्यान, आज रात्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना सुरत येथे भेटण्यास जाणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यानंतरच ‘ऑपरेशन लोटस’चे भवितव्य निश्चित होणार आहे. इकडे, शरद पवार यांनीदेखील उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. उद्या, तीनही पक्षांचे आमदार मुंबईत येत असून, त्यांच्या संख्याबळानुसार पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
इकडे शिंदे यांचे बंड गृहीत धरून डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न चालवले आहेत. काँग्रेसचेही ५ आमदार नॉट रिचेबल असल्याची बातमी आली होती. परंतु, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ती फेटाळून लावली. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत, त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ठाकरे यांची भेट घेतली. दिवसभरात तीनही पक्षांनी आपल्या आमदारांची संख्या मोजली असता, ती १५१ पर्यंत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तूर्त तरी उद्धव ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेता पदावरून हटविण्यात आल्याने, त्यांचा व्हीप आता आमदारांवर बंंधनकारक नाही. उद्यापर्यंत बंडखोर आमदार मुंबईत परत आले नाही तर मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते, असेही सूत्राने सांगितले. काँग्रेसने आपल्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर पक्षप्रभारी एच. के. पटेल यांनी निवेदन जारी करत, राज्यातील महाआघाडी सरकारला कोणताही धोका नाही. तसेच, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांशी संपर्क साधत, सरकारसोबत राहण्याचे आदेश जारी केले आहेत. तातडीने मुंबईत पोहोचण्यास सांगितले असून, तोपर्यंत सर्वांचे लोकेशन ट्रेस केले जाणार आहेत. नवी दिल्लीतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांचे दूत आ. डॉ. संजय कुटे हे सुरतला गेले होते. तेथे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून, त्यांना भाजपचा प्लॅन समजाविला असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरच शिंदे यांनी भूमिका बदलत, भाजपसोबत युती करण्याची मागणी पुढे केली आहे.
—————

