बाळासाहेबांची शपथ, गद्दारी करणार नाही!

editor 2 Min Read
2 Min Read

– आपण बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, पक्षाशी गद्दारी करणार नाही : एकनाथ शिंदेंचे ट्वीट

मुंबई (खास प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून, पक्षाशी गद्दारी करणार नाही, असे ट्वीट करत, बंड थंड होण्याचे संकेत दिले आहेत. शिंदे यांची विधिमंडळ गटनेते पदावरून शिवसेनेने हकालपट्टी केल्यानंतर, आणि खुद्द रश्मी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केल्यानंतर, त्यांनी बंडाचे पाऊल मागे घेतले. या सर्व घडामोडी पाहाता, भाजपनेदेखील सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे १५, एक राष्ट्रवादी काँग्रेस व काही अपक्ष आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सद्या सुरतमध्ये भाजपचा पाहुणचार घेत आहेत. क्रॉस व्होटिंगनंतर राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी रात्रीतून वेगवान हालचाली झाल्यात, परंतु शरद पवार यांनी दिल्लीतून सूत्रे हलविल्यानंतर दुपारनंतर एकनाथ शिंदे यांचा मूड बदलला व त्यांच्यातील शिवसैनिक जागा झाला. याबाबत त्यांनी ट्वीट करत सांगितले, की आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलेले आहे, स्व. आनंद दिघे यांनी आम्हाला गद्दारी शिकवलेली नाही. आपण सत्तेसाठी कधीही पक्षाला धोका देणार नाही.
दुसरीकडे, राजकीय घडामोडीत, काँग्रेसनेदेखील सावध पाऊले उचलली असून, सायंकाळी साडेपाच वाजता, आमदारांची बैठक बोलावलेली आहे. तत्पूर्वी, सर्व आमदारांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण होते. परंतु, दिल्लीतूनच पक्षप्रभारी एच. के. पटेल यांना मुंबईत पाठवून, आमदारांशी चर्चा केली जाणार आहे. विधानपरिषदेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे राजीनामा देणार होते. परंतु, त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय बदलला आहे. दुसरीकडे, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा सरकारच्या स्थैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. आमचे सरकार अल्पमतात जाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांना गटनेतेपद दिले आहे. शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले दादा भुसे, संजय राठोड व संजय बांगर यांना शिवसैनिकांनी हॉटेलमधून उचलून मातोश्रीवर नेले. तिथे तिघेही आमदारांना थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत १३ आमदार असावेत, अशी शक्यता आता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसने महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना सांगितले असून, ते मुंबईत पोहोचत आहेत.

Share This Article
Exit mobile version